गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०१४

शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक-पालक तसेच विश्वस्त मंडळ आणि माजी विद्यार्थी संघटना एकत्र

शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक-पालक तसेच विश्वस्त मंडळ आणि माजी विद्यार्थी संघटना एकत्र

स्वातंत्र्य दिनाच्या तिरंगा ध्वजारोहणाच्या निमित्ताने मालाड पूर्व च्या मंगेश शाळेतील गरजू विद्यार्थी मित्रांना दिलेल्या गणवेषवाटप सहकार्यातून मंगेश विद्या मंदिर माजी विद्यार्थी संघटनेने ऋणानुबंध कर्तव्याचा श्रीगणेशा केला. शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणा-या ११ आणि १४ ऑगस्ट च्या कलादालन स्पर्धेतील निकाल आणि त्याचे प्रदर्शन १५ ऑगस्टला मंगेश शाळेतील शिशुवर्ग सभागृहात लावण्यात आले होते. प्रदर्शनाला ८०० हून अधिक आजी माजी विद्यार्थी मित्रांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला. चित्रकला स्पर्धेतील माजी विद्यार्थी गटात प्रथम शैलेश पांढरे तर द्वितीय मंगेश धुमाळ , ५वी ते ७वी गटात प्रथम प्रतीक्षा घडवले तर द्वितीय केतन पाटणे , ८वी ते १०वी गटात प्रथम जयेश पाटील तर द्वितीय गटात अंकिता कदम यांनी यश मिळवले. माजी विद्यार्थी गटाच्या काव्यलेखन स्पर्धेत स्वप्नाली तोडणकर, निबंध स्पर्धेत प्रथम दर्शन होडावडेकर तर द्वितीय ऐश्वर्या राणे ह्यांनी बक्षीस पटकाविले तसेच कलाविशेष पुरस्काराने माजी विद्यार्थी श्री. संदीप तांबे यांना गौरविण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्यांना मंगेश विश्वस्त मंडळातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

शाळेच्या प्राथमिक विभागांतर्गत झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात मंगेश विश्वस्त मंडळातील डॉ. परळकर, श्री विंझणेकर आणि श्री गुप्ता उपस्थित होते. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहनरुपी मार्गदर्शन दिले. येत्या वर्षात शालांत निकाल १०० टक्के लागावा यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांना केले. माजी विद्यार्थी संघटनेच्या गणवेष वाटप आणि कलादालन स्पर्धा-प्रदर्शनाचे त्यांनी  मन:पूर्वक कौतुक केले. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक-पालक तसेच विश्वस्त मंडळाव्यतिरिक्त आता शाळेतील माजी विद्यार्थी संघटना ही झटत असल्याचा आनंद त्यांनी ह्यावेळी व्यक्त केला. माजी विद्यार्थी संघटनेच्या आगामी शालोपयोगी उपक्रमासाठी पाठींबा व सहकार्य देण्याचे वचन मंगेश विश्वस्त मंडळातील मान्यवरांनी केले. आमच्याकडे जे आहे त्यातून मुलांसाठी उत्तम सेवा कशी देता येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावणं आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं याकडे आम्ही विशेष लक्ष पुरवत राहू, कारण आत्मविश्वास असेल तर विद्यार्थी प्रत्येक स्तरावर नाव कमावू शकेल असे वक्तव्य उपस्थित शिक्षकांनी केले. अभ्यासासोबतच संगीत, कला, नाटय अशा विविध उपक्रमांना शाळेतून मार्गदर्शन देवून सामाजिक कार्यातही शाळा अग्रेसर राहील यासाठी शाळेला सहकार्य करण्याची भावना श्री. गुरुदत्त राणे यांनी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने व्यक्त केली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील प्राथमिक-माध्यमिक विभागातील सर्व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य तसेच मार्गदर्शन केले.

'युनिव्हर्सल मराठी' या संस्थेतर्फे 'माय मुंबई' लघुपट महोत्सवाचे आयोजन

'युनिव्हर्सल मराठी' या संस्थेतर्फे 'माय मुंबई' लघुपट महोत्सवाचे आयोजन
'युनिव्हर्सल मराठी' या संस्थेतर्फे 'माय मुंबई' लघुपट महोत्सव ३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. मानवी जीवनाच्या छटा, छोटेछोटे प्रसंग, भावभावना, एखाद्या विषयावरील भाष्य किंवा संकल्पना जिवंतपणे मांडणार्‍या लघुपटांचा हा महोत्सव रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथील मिनी थिएटरमध्ये भरविण्यात येणार आहे. सामाजिक जनजागृती, मोबाइल शूट फिल्म, दृश्य परिणाम म्हणजेच व्हीएफएक्स-अँनिमेशन, आंतरराष्ट्रीय लघुपट, जाहिरातपट अशा पाच गटांमध्ये प्रवेशिका असून तज्ज्ञ परीक्षक यातून विजेत्यांची निवड करतील.यानिमित्त नव्या निर्मात्यांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'धग' या चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील तसेच 'देवी' या आगामी मराठी चित्रपटातील कलावंत पूर्वा पवार, उदय सबनीस, विलास उजवणे, अंजली उजवळे, बाळ धुरी व दिग्दर्शक दत्ता जमखंडे उपस्थित राहणार आहेत.
 www.mymumbai2013.blogspot.com ह्या साईट वर तसेच 9833075706/9029333078/ 9768930853. ह्या क्रमांकावर संपर्क करावा.

मंगेश शाळेत 'स्वच्छता अभियान"

मंगेश शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मंगेश शाळेत  दि. १६ व १७ नोव्हेंबर (शनिवार -रविवार ) ह्या दिवशी 'स्वच्छता अभियान" आयोजित केले आहे.

दिवाळीची सुट्टी संपून शाळेच्या नव्या द्वितीय सत्राची सुरुवात होणार आहे. ह्या  निमित्ताने आजी विद्यार्थी मित्रांना हि अनोखी स्वच्छ आणि सुखद भेट देण्यात येईल .माजी विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने श्रमदान करुन स्वच्छता मोहीम राबविणार आहेत.  स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आजी विद्यार्थी मित्रांमध्ये स्वच्छता ठेवण्याचा संदेश जावा , या उद्देशाने मंगेश शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आयोजित केला आहे. "माझी शाळा - स्वच्छ शाळा'" हे बिंबविण्यासाठी तसेच सामाजिक उन्नतीसाठी विद्यार्थी मित्रांमध्ये स्वच्छतेच्या सवयींचा प्रचार-प्रसार करणे हा त्यामागील हेतू आहे.

मालाड च्या विद्यार्थ्यांसाठी "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका"

मालाड च्या विद्यार्थ्यांसाठी "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका"
मालाड पूर्वच्या कुरार गावातील मंगेश विद्या मंदिर शाळेत "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले " अभ्यासिका १० फेब्रुवारी पासून संध्याकाळी ७ ते ९.३० या वेळेत सुरु होणार आहे. शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, शाळेचे माजी विद्यार्थी तसेच स्थानिक ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत सोमवारी संध्याकाळी ६ वाजता विद्यार्थ्यांसाठी स्व-अध्ययन व्यासपीठ खुले होणार आहे. विभागातील सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेत मोफत प्रवेश दिला जाईल.
   कुरार गावात अधिका-अधिक चाळ वस्ती आहे. लहान खोल्या, परिसरातील गजबज तसेच संध्याकाळचे टिव्ही कार्यक्रम अशा अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात एकांत मिळत नाही. सध्या १०-१२वी तसेच १५वी साठी हा परिक्षेचा कालावधी आहे म्हणून मंगेश विश्वस्त मंडळाच्या संमतीने शांत वातावरण असलेली अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे.
      मंगेश विद्या मंदिर- माजी विद्यार्थी संघ, स्थानिक ज्येष्ठ नागरिक व पालक असे सर्वजण आपापल्या परीने "पर्यवेक्षक" म्हणून विशेष सहभाग देणार आहेत. कुरारच्या पोलिस अधिकाऱ्यांनी  अभ्यासिका उपक्रमाचे विशेष कौतुक करत त्यात विशेष सहकार्यरूपी पाठिंबा दिला आहे. अभ्यासिकेची प्रवेश प्रक्रिया दर रविवारी असेल. मालाड-गोरेगाव-कांदिवली च्या सर्व विद्यार्थ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा.

'डूडल सोशल अड फेस्टिवल २०१४' चा उद्घाटन सोहळा

'डूडल सोशल अड फेस्टिवल २०१४' चा उद्घाटन सोहळा
मुंबई / प्रतिनिधी:
समाजामध्ये घडणाऱ्या विविध  घटना, प्रसंग त्याचबरोबर सामाजिक समस्या, प्रश्न आपल्या कलाकृतीद्वारे सादर करून,सृजनशील जाहिराती (प्रिंट अड्स) व जाहिरातपट (अड फिल्म्स) निर्माण करणाऱ्या विध्यार्थी आणि व्यावसायिक कलाकारांसाठी 'डूडल सोशल अड फेस्टिवल २०१४', हे विशेष व्यासपीठ 'मंथन आर्ट स्कूल' या संस्थेद्वारे निर्माण करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उत्कंठा वाढवलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन जाहिरात क्षेत्रातले दिग्गज व 'पॉप्स' या नावाने ओळखले जाणारे श्री. केव्हि. श्रीधर (चीफ क्रियेटीव्ह ऑफिसर इंडिया सब कॉनटीनंट-लिओ बर्नेट) यांच्या हस्ते करण्यात आले. तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. रत्नाकर मतकरी (मराठी साहित्य, नाट्य व चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक) आणि श्री. विक्रम गायकवाड (को फौन्डर अंडरडॉग कम्युनिकेशनस) हे उपस्थित होते. हा महोत्सव रवींद्र नाट्य मंदिरच्या पु. ल. देशपांडे अकादमीत आर्ट ग्यालरी  हॉलमध्ये २२ फेब्रुवारी पासून २ मार्च पर्यंत घेण्यात येणार आहे.नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भ्रष्टाचार, बालमजुरी, महिला अत्याचार, वाढती महागाई यासारख्या सामाजिक समस्यांवर कलेच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन देश पातळीवर करण्यात आले आहे. देशातील पहिला सोशल अड फेस्टिवल असणाऱ्या या महोत्सवात देश-विदेशातून तब्बल ४९० प्रिंट अड व अड  फिल्म्सनी सहभाग घेतला आहे. त्यामध्ये १३१ अड एजेन्सीज त्याचबरोबर मुंबई, पुणे सहित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशभरातून दिल्ली, पंजाब, आसाम, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई, केरळ, विशाखापटनम तर विदेशातून इंग्लंड व फिलिपाईन्स येथून या महोत्सवाला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे या महोत्सवाची रंगत आणखी वाढली आहे.
जाहिरात क्षेत्रातील दिग्गजांच्या परीक्षणातून निवड झालेल्या जाहिरातींचे सर्वांसाठी खुले प्रदर्शन या महोत्सवात मांडण्यात आले आहे. त्याचा सर्वसामान्य प्रेक्षकांना आस्वाद घेता येईल. सर्वसामान्यांचे प्रश्न, समस्या आपल्या कलाकृतीतून सादर करून प्रभावी सामाजीक संदेश देण्याचा प्रयत्न या प्रदर्शनात मांडलेल्या भित्तीचित्रातून दिसेल.विजेत्यांना रोख रकमेसहित सुवर्ण, रौप्य व कास्य पारितोषीक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येईल. यावेळी 'कॉर्पोरेट आयडेंटीटी', 'इज युवर एक्स्पीरीयन्स डिझाइन द नेक्स्ट बिग थिंग', 'क्रियेटीव्ह कॉपी रायटिंग', 'क्रियेटीव्हीटी इन अडव्हरटायझींग' या विषयांवर राजेश कुलकर्णी, सौरभ चांदेकर, रायोमंड पटेल, सौरभ करंदीकर या तज्ञांच्या कार्यशाळेमध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी या क्षेत्रातील नवोदितांना व व्यावसायिक कलाकारांना लाभणार आहे.बक्षीस सभारंभ श्री.केव्हि. श्रीधर, श्री.गोपी कुकडे (अड गुरु) व श्री.संजय खरे (व्हाइस प्रेसिडेंट-पिनस्टोर्म) यांच्या हस्ते रविवार दिनांक २ मार्च रोजी होईल.चित्रपट व अडव्हरटायझींग क्षेत्रातील नामवंताची उपस्थितीहि यावेळी असेल. अशी माहिती 'मंथन आर्ट स्कूल' संस्थेचे संस्थापक प्रा.शशीकांत गवळी यांनी दिली.

बुधवार, ११ एप्रिल, २०१२

राजावाडी हॉस्पिटलमध्ये अपघातातील जखमी पेशंटची योग्य काळजी घेतल्याच्या विरोधात मनसे . राम कदम यांनी जाहीर पोस्टरबाजीकरून तोडफोड धरणेसाठी आवाहन केल्याप्रकरणी घाटकोपर येथील पतंगनगर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

भटवाडीमध्ये एप्रिल रोजी कारने १७ निष्पाप लोकांना उडविले . त्यांना उपचाराकरता राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले . परंतु जखमींवर तेथे योग्य उपचार करण्यात आले नाही . तसेच हॉस्पिटल प्रशासनाने जखमींना दिलेली वागणूक अतिशय निराशाजनक आहे अशी तक्रार राम कदम यांनी केली आहे . तसेच पोस्टरवर हे हॉस्पिटलप्रशासनाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी चक्क राजावाडी तोडफोड धरणे जाहीर करून लोकांना उपस्थित राहण्याचे आवाहनही यामध्ये करण्यात आले आहे .

रविवारपासून हे प्रक्षोभक पोस्टर शहराच्या विविध भागात झळकत असूनही कारवाई का होत नाही , असा सवाल वृत्तपत्रांतून विचारण्यात आल्यानंतर आज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दरम्यान , मनसे कार्यकर्ते आणि राम कदम यांच्या समर्थकांनी हॉस्पिटलसमोर आंदोलनास सुरुवात केली आहे .
मुंबई - राज्यभरातील एकूण 15 लाख रिक्षाचालक व मालक रविवारी (ता. 15) मध्यरात्रीपासून राज्यव्यापी संपात सहभागी होणार आहेत. इंधनामध्ये झालेली दरवाढ, तसेच महागाई निर्देशांकानुसार रिक्षाची भाडेवाढ मिळावी, अशा मागण्या रिक्षाचालकांच्या असल्याची माहिती ऑटोरिक्षा चालक-मालक कृती समितीतर्फे शरद राव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. रिक्षा संपासाठी आक्रमक पवित्रा घेत नियोजित संप हा अटळ असल्याचाही राव यांनी इशारा दिला आहे.
आठवडाभरात रिक्षाचालकांनी ठरविलेले भाडेपत्रक परिवहन विभागाला देण्यात येणार आहे. त्यानुसारच भाडेवाढ द्यावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. ऑटोरिक्षा भाडेवाढीसाठी वेगळे सूत्र मांडण्यात यावे, तसेच दिवसेंदिवस वाढत जाणारा खर्च आणि महागाई निर्देशांकाचा ताळमेळ घालण्याचाही विचार करण्यात यावा, अशीही मागणी आहे. रिक्षाभाड्यात पहिल्या 1.6 किलोमीटरसाठी किमान 16 रुपये, तर नंतरच्या टप्प्यासाठी 9 रुपयांची भाडेवाढ संघटनेला अपेक्षित आहे.